पुणे
मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी मधून धालेवाडी- कोथळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली होती. संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती साठी पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे धालेवाडी आणि कोथळे येथील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून देखील याची दखल जिल्हा परिषदेने अद्याप घेतली नाही. धालेवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, पिसर्वे, हंबीरबेंद या सर्व गावच्या नागरिकांना याच रस्त्याने जेजुरी बाजारपेठेला येण्या-जण्यासाठी वाहतूक करावी लागत असते. परंतु रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्ड्यामधून वाट काढत पुढे जाणे जिकीरीचे ठरत होते. पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच साईडपट्टी पूर्ण पणे खचल्यामुळे रस्त्याची उंची जमिनीपेक्षा अधिक जास्त होऊन अपघाताचे प्रमाण खूपच वाढले होते. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्डयात पावसाचे पाणी साठून राहिल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत होते. काही ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला मोठ्या तळ्याचे स्वरूप देखील आले होते. एक महिन्यापूर्वीच एका मोठ्या खड्ड्यात पडून दुर्दैवाने येथील एक प्रगतशील शेतकरी व्यावसायिकाचा बळी देखील गेला होता.
या सर्व गोष्टीची दखल घेऊन आणि विचार करून धालेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत निधी व लोकसहभागातून २० जुलै रोजी या रस्त्याचे मुरूम टाकून खड्डे भरून घेण्याचे काम करण्यात आले.तसेच रस्त्याच्या कडेला असणारी काटेरी झाडे हटविण्याचे देखील काम करण्यात आले.
यावेळी उपस्थित जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप भैय्या बारभाई तसेच धालेवाडी गावचे सरपंच शरद काळाणे, उपसरपंच रोहिदास गायकवाड, चेअरमन हनुमंत काळाणे, सदस्य प्रभाकर भालेराव, वंदना काळाणे ,शशिकला साबळे, लक्ष्मीबाई कदम, अंकिता काळाणे, मानवाधिकारचे सचिव कैलास काळाने, कोथळे चे माजी सरपंच वंदना जगताप, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळाणे, सुरेश साबळे, दिपकतात्या काळाणे, प्रदीप कदम, रोहित साबळे, आकाश लेंडे, चेतन कदम, किरण कुदळे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळेस रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिकांनी धालेवाडी ग्रामपंचायतचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. संबंधित प्रशासन , सार्वजनिक बांधकाम विभाग , पुणे जिल्हा परिषद यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी धालेवाडी , कोथळे, रानमळा येथील स्थानिक ग्रामस्थ, तसेच प्रवाशी यांच्याकडून होत आहे.