पुणे
दौंड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून केतन डुंबरे (वय 27) या युवकाचा धारदार शस्त्राने आणि दगड-विटांनी मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दौंड परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, केतन डुंबरे याच्यावर आरोपिंनी शुक्रवारी (5 सेप्टेंबर) रात्री अचानक हल्ला चढवला. त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर दगड व विटांनी वार करण्यात आले. या अमानुष हल्ल्यात केतन गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
ही घटना गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडल्याने संपूर्ण शहरात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे दौंड शहरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.