पुणे
परळी खोर्यातील कारी येथे ह्रदय हेलावणारी घटना घडली. गर्भवती मातेने चिमुकल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मातेसह एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला. विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्यामुळे एका चिमुरडीचा जीव वाचवता आला.
या घटनेत गर्भातील बाळही दगावले आहे. ऋतुजा विशाल मोरे (वय 27), स्पृहा विशाल मोरे (वय 3) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. त्रिशा विशाल मोरे (वय 6) ही चिमुरडी मात्र या घटनेत बचावली आहे.
परळी खोर्यातील कारी येथील विशाल मोरे हे मुंबई येथे परिवारासह वास्तव्याला आहेत. एक्सपोर्ट – इनपोर्टचा त्यांचा छोटा व्यवसाय आहे. त्याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवतात. सध्या गणेशोत्सवामुळे हे कुटुंब कारी गावी आले होते. गणेशोत्सवानंतर ते पुन्हा मुंबईला परत जाणार होते.
मात्र गुरुवारी एका अनपेक्षित घटनेने या कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाली. विशाल मोरे यांच्यासह पत्नी ऋतुजा, मोठी मुलगी त्रिशा व छोटी मुलगी स्पृहा असा हा परिवार. मात्र गुरुवारी दुपारी घरामध्ये नेमके काय घडले? कळले नाही. ऋतुजा आपल्या त्रिशा व स्पृहा या मुलींना घेवून घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीच्या दिशेने गेल्या.
त्यांनी चिमुरड्या मुलींसह विहिरीत उडी घेतली. विहिरीतील झाडाची फांदी हातात आल्यामुळे मोठी मुलगी त्रिशा लोंबकळत राहिली. यावेळी या तिघींच्या किंकाळ्यांनी परिसर भेदरुन गेला.
गणपतीसाठी हराळी आणण्यासाठी विहिरी शेजारी आलेल्या काही ग्रामस्थांना या किंकाळ्या ऐकू येताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्रिशा लोंबकळत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने त्रिशाला वाचवले. याचवेळी विहिरीत ऋतुजा व स्पृहा एकमेकांना बिलगून बुडाल्याचे दिसून आले.