मोठी बातमी!!!!            छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर प्रकल्पातून पारगाव वगळणार?

मोठी बातमी!!!! छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर प्रकल्पातून पारगाव वगळणार?

पुणे

पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित विमानतळ प्रकल्पाला आता चांगलीच गती आली आहे. आता पुढील टप्पा प्रत्यक्ष जागेवरील सर्व्हेचा असून त्यादृष्टीने प्रशासन तयारीला लागले आहे.येत्या एक ते दोन आठवड्यात शेतकर्‍यांना याबाबत 32/3च्या नोटीस निघणार असल्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह शेतकर्‍यांच्या बैठकीत प्रकल्पासाठी तीन हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान प्रकल्पासाठी कमी जागा लागणार असल्याने पारगावमधील केवळ 5 ते 10 टक्केच जागेचे भूसंपादन करण्यात आहे. तर उर्वरित क्षेत्र पूर्णपणे वगळण्यात येणार असून याबाबत येत्या आठवडाभरात शासकीय अधिसूचना निघेल अशी माहिती मिळाली आहे.पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव अशा सात गावात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून त्यासाठी सात गावांतील एकूण 2832 हेक्टर क्षेत्रावरील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

दरम्यान सुरुवातीला शासनाने प्रकल्पासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव बरोबरच वाघापूर आणि राजेवाडी गावांचीही नावे जाहीर केली होती; परंतु वाघापूर आणि राजेवाडी गावाने प्रखर विरोध केला. त्यानंतर वाघापूर आणि राजेवाडी ही दोन गावे वगळून उर्वरित सात गावात प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला.

दोन गावे प्रकल्पातून वगळल्यानंतर उर्वरित गावे वगळण्यासाठी तब्बल आठ ते नऊ वर्षे शासनाच्या विरोधात संघर्ष सुरु आहे. वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, निषेध सभा, जाहीर मेळावे घेवून शासनाचा निषेध करण्यात आला; मात्र शासनाने हह गावे वगळण्यास नकार दिला. एवढेच नाही तर प्रकल्पाला विरोध असलेल्या लोकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान विमानतळ प्रकल्पाला 2025 मध्येच खर्‍या अर्थाने गती आली असून शासनाकडून वेळोवेळी विविध प्रक्रिया पार पाडल्या आहेत.

यापूर्वी शासनाने ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास शेतकर्‍यांनी कडवा विरोध केल्यानंतर पोलिसांकडून झालेला लाठीहल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण राज्यातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे शासनाने ड्रोन सर्व्हे थांबवला. आणि विविध मार्गाने प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यासाठी शेतकर्‍यांना वेगवेगळ्या नोटीस पाठवून हरकती मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आल्या.

यामध्ये सर्व्हेची माहिती संकलित केली. सद्यस्थितीत प्रक्रिया थंड असल्याचे वरवर वाटत असले तरी शासकीय पातळीवर मात्र जोरदार कामकाज सुरु आहे. आता पुढील टप्प्यात 32 / 3 च्या नोटीस शेतकर्‍यांना पाठविण्यात येणार असून शेतकर्‍यांच्या संमतीने प्रत्यक्ष शेतावरील सर्व्हे महसूल, कृषी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या नोटीस तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

खानवडी, मुंजवडीमधील काही क्षेत्र वगळणार..

आता शासनाने पारगाव हे गाव वगळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. प्रकल्पात पारगाव सर्वात मोठे गाव असून याच गावचे सर्वाधिक क्षेत्र संपादित करण्यात येणार होते. तसेच याच गावातून सर्वात जास्त हरकती प्राप्त झाल्या होत्या. एवढेच नाही तर इतर गावांच्या तुलनेत पारगावचा सर्वात तीव्र विरोध होता. साहजिकच विमानतळ प्रकल्पासाठी जेवढे क्षेत्र लागणार आहे तेवढेच क्षेत्र संपादित करण्यात येणार असून, याव्यतिरिक्त इतर कोणताही प्रकल्प करण्याच्या मनस्थितीत सरकार नसल्याने तीन हजार एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे पारगाव मधील जवळपास 90 ते 95 टक्के क्षेत्र वगळण्यात येणार असून त्याबरोबरच खानवडी, मुंजवडी मधील काही क्षेत्र वगळण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *