पुणे
सासवड येथील गट क्र. ७३/७ मधील रस्त्यावरून प्रवेश नाकारणाऱ्या व खाटीक समाजाच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपी मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेंद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांविरुद्ध फिर्याद पूजा कमलाकर घोडके यांनी सासवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विजय शंकरराव घोडके यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी गोरख भगवा विटकर यांच्याकडून गट क्र. ७३/७ मधील दोन गुंठे जागा खरेदी केली होती. त्यावर त्यांचे कुटुंब विटकर चाळ नावाच्या परिसरात घर बांधून राहत असून तेथे त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांचेजवळील रहिवासी पूजा विजय धोत्रे आणि जयश्री राजेंद्र धोत्रे आहेत.
सदर जागेतील रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून वादात आहे. हा वाद तहसिल कार्यालय सासवड येथे एस/आर/६/२०२५ अन्वये सुरु असून, ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता तहसिलदार विक्रम रजपूत यांनी स्थळ पाहणी केली. त्यांनी उपस्थितांना स्पष्ट सांगितले की कोणालाही कायदेशीर रस्ता अडवता येणार नाही.
परंतु, तहसिलदार निघुन गेल्यावर संशयित आरोपी मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे आणि धर्मेंद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांनी संबंधित महिलेस जातीवाचक अपशब्द वापरून रस्त्यावरून जाण्यास विरोध केला. “तुम्ही खाटकांनी या रस्त्यावरून जायचे नाही, आम्ही येथे कंपाऊंड करणार आहोत,” असे म्हणत धमकी दिली गेली.
तसेच शेजारील पूजा विजय धोत्रे व जयश्री राजेंद्र धोत्रे यांनाही रस्त्यावरून जाण्यास मनाई करत शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. यामुळे पीडित कुटुंब भयभीत असून आरोपींकडून जीवितास धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या घटनेविषयी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत