पुणे
दौंड तालुक्यातील गिरीम – गोपाळवाडी (ता. दौंड) रस्त्यावर झालेल्या अपघातात गोपाळवाडी येथील सूरज होले या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गोपाळवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच लक्ष्मी राजाराम होले यांचा तो थोरला मुलगा होता.
७ ऑगस्ट रोजी रात्री सूरज उर्फ सूर्या राजाराम होले (वय-२५, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) याचा अपघात झाला. सूरज होले हा दुचाकीवरून जाधववाडी येथून गोपाळवाडी येथे परतत असताना भवानीनगर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेनंतर त्याचा मृत्यू झाला. शेती आणि वाहतुकीचा व्यवसाय करणारा सूरज याच्या दुर्देवी मृत्यूमुळे गोपाळवाडी, गिरीम, कुरकुंभ व दौंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सूरज होले याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान भाऊ, आजी व आजोबा, चुलते, असा मोठा परिवार आहे. दौंड पोलिस ठाण्यात या बाबत महादेव बबन होले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात वाहनचालकाविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.