पुणे
तुम्ही वारंवार बहिणीकडे का जाता?” या कारणावरून नारायणगाव तालुक्यातील मांजरवाडी येथे मुलाने स्वतःच्या वडिलांवर अमानुषपणे हल्ला करून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.वडिलांवर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. 17 जुलै) त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा गणेश खंडागळे (वय 38) याला अटक केली आहे. मृत वडिलांचे नाव ज्ञानेश्वर नाथा खंडागळे (वय 55) असून, ते मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 16) ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर त्यांचा मुलगा गणेश याने “तुम्ही बहिणीकडे का जाता?” या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यांच्याशी दमदाटी केली. नंतर त्यांना खाली पाडून छाती, पोट आणि डोक्यावर जोरजोरात लाथा मारून गंभीररीत्या जखमी केले.घटनेनंतर शेजारील व्यक्तीने तातडीने नारायणगाव पोलिस ठाण्याला फोन करून माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेतील ज्ञानेश्वर खंडागळे यांना तत्काळ नारायणगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस जवान आनंदा चौगुले यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलेल्या ज्ञानेश्वर खंडागळे यांचा गुरुवारी मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी गणेश खंडागळे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत.