पुणे
पुरंदर हवेलीचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना जोर होता.अखेर सासवड येथे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. संजय जगताप यांच्यासोबत सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचाही सहभाग होता. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप यांनी सुरुवातीलाच उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सांगितले, “पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमालाही उशीर झाला, याबद्दल क्षमस्व. माझ्या स्वभावात दोष आहे – मी कायम उशीरा पोहोचतो.”
ते पुढे म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता म्हणून आज पक्षप्रवेश करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, भाजपची साथ – ही मला लाभलेली संधी आहे. इथे विकास आहे, राजकारण नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय देऊन कुठलाही प्रकल्प राबवला जात नाही. सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारा विचार मला भावला, म्हणून मी इथे आलो.”
“विमानतळ पुरंदरलाच होणार, आणि योग्य ठिकाणी होणार”
जगताप यांनी आपल्या भाषणात पुरंदरच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे मांडले. “पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, विमानतळाचा मुद्दाही तसाच आहे. मात्र, मी शब्द देतो की विमानतळ पुरंदरमध्येच होणार – आणि तो योग्य ठिकाणीच होणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
संजय जगताप यांच्यासह एकूण ३७८ कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावर बोलताना त्यांनी सांगितले, “फक्त मीच नव्हे, तर माझ्यासोबत प्रत्येक कार्यकर्ता भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आज ३ हजार जणांचा पक्षप्रवेश अपेक्षित होता, मात्र यादीत बदल करून निवडक कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्यात आला.”
“आता मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी तळमळीने पार पाडेन. पुरंदर हवेलीच्या जनतेला, भाजपच्या कुटुंबाला सांगतो – कुठल्याही अन्यायाच्या विरोधात मी ठामपणे उभा राहीन. विकासासाठी कुणालाही राजकारण करू देणार नाही,” असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
विजय शिवतारेंना नाव न घेता टोला
आपल्या भाषणाच्या शेवटी संजय जगताप यांनी विजय शिवतारेंना नाव न घेता टोला लगावत म्हणाले, “मागच्या दोन वर्षांत साडीने आमच्या पुरंदरला गुंडाळून टाकलं.”