पुणे
पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कुडांई मेन्स पार्लरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेत दुकानाची तोडफोड करून मालकावर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले.या हल्ल्यात दत्तात्रय वाघ (वय 22) गंभीर जखमी झाला असून, शिरूर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय वाघ हा त्याची पत्नी स्नेहासह टाकळी हाजी येथे राहतो. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाच्या नातेवाइकांना हा विवाह मान्य नव्हता. स्नेहाचा मावसभाऊ जीवन रविंद्र गायकवाड (रा. कानगाव, ता. दौंड) आणि नात्यातील इतर व्यक्तींनी यापूर्वीही दत्तात्रयला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. यासंदर्भात दत्तात्रयने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दत्तात्रय आपल्या कुडांई मेन्स पार्लरमध्ये शटर बंद करून ग्राहक आशुतोष भाकरेचे केस कापत होता. यावेळी जीवन गायकवाड, शारुख शेख (वय 26, रा. पाटस, ता. दौंड) आणि प्रशांत साठे (वय 19, रा. पाटस, ता. दौंड) हे तिघे अचानक दुकानात घुसले. त्यांनी दुकानाचे शटर उघडून काचा फोडल्या, साहित्याची नासधूस केली आणि जीवन गायकवाडने लोखंडी कोयत्याने दत्तात्रयच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केले.
हल्ल्यानंतर तिघेही मोटारसायकलवर रांजणगावच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने पाठलाग करून शारुख शेख आणि प्रशांत साठे यांना पकडले आणि टाकळी हाजी पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी जीवन गायकवाडच्या सांगण्यावरून हल्ला केल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी जीवन गायकवाड मात्र फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीनुसार, शिरूर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गंभीर दुखापत, तोडफोड आणि जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.