पुणे
शिरूर तालुक्यातील आंबळे गावात सहा अज्ञात इसमांनी एका घरावर मध्यरात्री हल्ला चढवत दरोडा टाकला. या दरोड्यात दोन महिलांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले.
एकूण अंदाजे 1 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना दिनांक 6 जुलै रोजी पहाटे 1 वाजता शिरूर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी कल्पनाबाई निंबाळकर आणि त्यांची सासऱ्यांची बहीण रत्नाबाई शितोळे या दोघी झोपेत असताना सहा अनोळखी युवकांनी त्यांच्या घरात घुसून हातातील दांडक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले.
कल्पनाबाई निंबाळकर यांचे गळ्यातील एकूण 80,000/- ₹ किमतीचे सोन्याचे दागिने आणि 4,000/- ₹ किमतीच्या चांदीच्या जोडव्या,
रत्नाबाई शितोळे यांचे 80,000/- ₹ किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण चोरीस गेलेला ऐवज -अंदाजे 1,64,000/- रुपयांचा आहे.
या घटनेची नोंद पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी केली असून, तपासाधिकारी म्हणून पोसई शुभम चव्हाण काम पाहत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेतीलआरोपी हे 20 ते 25 वयोगटातील असून मराठी भाषिक आहेत. गावात व परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.