पुणे
पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून संशयित आरोपीचे स्केच जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून, संशयिताच्या शोधासाठी १० विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत.
ही घटना 30 जून 2025 रोजी पहाटे घडली. पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या एका भजनी मंडळाच्या गाडीतील काही भाविक स्वामी चिंचोली येथील एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीतील नागरिकांवर कोयत्याचा धाक दाखवत हल्ला केला.
त्यानंतर डोळ्यांत मिरची पूड टाकून गोंधळ निर्माण केला आणि महिलांच्या अंगावरील दागिने लुटले आणि सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीवर चहाच्या टपरीमागे नेऊन लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
संशयिताचे स्केच जाहीर
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 448/2025, भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 309(6), 351(2), 3(5) नुसार नोंदवण्यात आलेला असून, संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) पुणे ग्रामीण पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.
माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणी या स्केचमधील व्यक्तीला ओळखत असेल, किंवा त्याच्याबाबत काही माहिती असल्यास खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
संपर्क क्रमांक:
पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) – श्री. बापूराव दडस
मोबाईल: 9049664673
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) – श्री. राहुल गावडे
मोबाईल: 9823165080
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) – श्री. दत्ताजी मोहिते
मोबाईल: 8308844004