पुणे
सख्ख्या भावाकडून सततची होणारी भांडणे व त्याच्यापासून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून व मनात राग धरून गावचा तंटामुक्ती अध्यक्ष असणाऱ्या भावाने त्रास देणाऱ्या भावावर चाकुने हल्ला करीत खुन केल्याची घटना लखमापूर (ता.दिंडोरी) शिवारात घडली.
म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथील शरद दत्तू बर्डे (वय ४५, रा. म्हेळुस्के, ता. दिंडोरी) हा सख्खा भाऊ हरी दत्तू बर्डे यांच्याशी सततची भांडणे करीत त्रास देत होता. याचाच मनात राग धरून लखमापूर गावातील फळविहिरीजवळ (ता. दिंडोरी) गुरुवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास हरी बर्डे याने चाकूने छाती व मांडीवर वार करीत भाऊ शरद बर्डे याचा खून केला.
याबाबतची फिर्याद मृताचा मुलगा तुषार शरद बर्डे वणी पोलिसांत दिली असून, त्यानुसार पोलिसांनी म्हेळुस्के गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेला हरी बर्डे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. याबाबत घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे तपास करीत आहेत.