पुणे
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका खाजगी सावकाराने आणि त्याच्या भावाने एका शेतकर्यावर त्याच्या घरात घुसून जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विश्वास गिरमे नावाच्या शेतकऱ्याने सावकार बाळासाहेब शितोळे यांच्या अवैध सावकारीविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे अवैध सावकारीचा दावा दाखल केला आहे.
दरम्यान, 4 मे 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शेतकरी गिरमे यांच्या बाजूने निकाल दिला. गिरमे यांच्या बाजूने बाजूने निकाल लागल्याचा राग मनात धरून सुनावणीनंतर दौंड तालुक्यातील चौफुला बोरीपार्धी येथे 8 मे 2025 रोजी आल्यावर सावकाराने गिरमे यांना शिवीगाळ केली.
९ मे २०२५ रोजी बाळासाहेब शितोळे आणि त्यांचा भाऊ शहाजी शितोळे यांनी पाटस येथील गिरमे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत, “कोर्टाचा निकाल तुझ्या बाजुने लागला, तर तुला लय माज आला काय” असे म्हणुन लोखंडी रॉडने मारहाण केली. बाळासाहेब शितोळे आणि त्याच्या भावाने लाकडी काठीने आणि लोखंडी रॉडने गिरमे यांना जबर मारहाण केली.
दरम्यान, गिरमे यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतु जबर मारहाण केल्यामुळे गिरमे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर १३ मे २०२५ रोजी त्यांनी आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सावकार आणि त्याच्या भावाविरुद्ध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राजीव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.