पुणे
पुरंदर तालुक्यातील मांढर येथील विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष तान्हाजी पापळ यांच्यावर एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घडली आहे.याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पापळ हे पुतण्या अजित पापळ यांच्यासह डोंगरावरील काळुबाई मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी दिपक सोपान पापळ हे मंदिरात दारू पीत बसले होते. तानाजी पापळ व दिपक पापळ यांच्यात जुना वाद आहे. या वादातील ‘जुनी पोलीस तक्रार मागे घे’ असे म्हणत दीपक यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली.
त्यावर मंदिरात दारू का पितोस? असे विचारले असता दिपक पापळ यांनी कोयत्याने हल्ला करत तानाजी पापळ यांना जखमी केले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात तानाजी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत दिपक पापळ यांना विचारले असता, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. तर धारदार शस्त्राचा धाक दाखवून, दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांना त्वरित अटक करून, कारवाई करण्याची मागणी तानाजी पापळ यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत.