पुणे
मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावच्या हद्दीत शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. चंद्रकांत लक्ष्मण जावळे (वय ६०, रा.नीरा, ता. पुरंदर) व उत्तम गायकवाड (वय ४५, रा. नीलकंठ) यांचा अपघातात मृत्यू झाला.
याबाबत भोर पोलिसांनी माहिती दिली की, चंद्रकांत जावळे आणि उत्तम गायकवाड हे दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ टी.जी. ०९४६) निळकंठ गावाकडे निघाले होते. त्यावेळी समोरून येत असलेली दुचाकी (क्र. एम.एच. १२ डब्ल्यू.सी. २७२०) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले.
दोघांच्याही डोक्यांना मार लागला होता.जावळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायकवाड यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी काही मिनिटांमध्येच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरा दुचाकीस्वारही जखमी झाल्याने तोही उपचारासाठी निघून गेला.
याबाबत वैभव आनंदा गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीवर गुन्हा दाखल केला आहे.