पुणे
ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी कार्यालयात जावून चोप दिला आहे. शिवाय, त्याच्या तोंडाला काळं फासलं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत हा प्रकार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
शिंदखेडा पंचायत समितीमध्ये असलेल्या विस्तार अधिकाऱ्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविकेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवाय, 2020 पासून तो महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होता. गेल्या चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे.
वारंवार होणाऱ्या या त्रासाला ग्रामसेविका कंटाळली होती.शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार पीडित महिलेने सांगितला. यानंतर त्यांनी शिंदखेडा येथील पंचायत समिती कार्यालय गाठले. विस्तार अधिकाऱ्याच्या कार्यालयातही ते गेले.
तिथे संबधित अधिकारी उपस्थित होता. शिवसेना स्टाईलने त्यांना विचारण्यात आले. महिलेने केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली. शिवाय, तुम्ही असं का करत आहात? असा जाबही त्यांना विचारण्यात आला.
उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले.दरम्यान, पीडित महिला ही त्यावेळी उपस्थित होती. तिने त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्याला चोप देण्यात आला. शिंदखेडा पंचायत समिती येथे हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.