पुणे
अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. याचवेळी बैल पळत सुटल्याने चिमुकला ओढत नेल्याने गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला.
सदरची घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.हवेली तालुक्यातील फुलगाव येथील शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असे सदर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. हि दोरी मोठी होती.
मात्र यावेळी बैल पळत सुटल्याने या दोरीचा शौर्यच्या गळ्याभोवती व अंगावर फास बसला. यामुळे तो बैलाच्या मागे दोरीमुळे ओढत गेल्याने त्याला जबर मार लागला. घटना घडली यावेळी त्याचे पालक घरात होते.
आवाज आल्याने ते बाहेर आले. तेव्हा शौर्य गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तो फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. लोणीकंद पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.