पुणे
निसर्गाच्या सानिध्यात पारंपारिक पद्धतीने राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून झोपेत असतानाच काही समजण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं.
या दुर्घटनेत एकूण १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र हे बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. नवी मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र हे मदतकार्य सुरू असतानाच अनेक अडचणी येत होत्या. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता.
मात्र अडचणींचा डोंगर पार करत सगळे जवान मदतकार्य करत होते. परंतु अशातच एक दुर्दैवी अशी घटना घडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं.
शिवराम ढुमणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इतर सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र वाटेतच ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असतानाच झालेल्या ढुमणे यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली