पुणे
पाटस – दौंड रस्त्यावर एका कारची गाडी आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी हे जालना येथून जेजुरी या ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी गाडीतून निघाले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रक हा पाटस बाजूकडून दौंड दिशेला जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात आठ प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये ट्रकची दोन्ही चाके तुटून पडली आहेत. तर कारचा अक्षरश: चक्काचुर झाला आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळतात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित इंगवले, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चारचाकी गाडीतील जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी दौंड रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.