पुणे
दोन मित्रांनी मिळून आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसणे पैशांवरुन ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. भोर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. अक्षय होळकर आणि समीर शेख असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोघांनी मिळून दत्तात्रेय पिलाणे याची हत्या केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय याच्याकडून अक्षय होळकर यांने पाच-सहा लाख रुपये उसणे घेतले होते.
बरेच दिवस झाल्याने दत्तात्रेयने पैसे परत मागितले. मात्र अक्षयने दत्तात्रेयला पैसे देण्याऐवजी त्याला संपवण्याचा कट रचला. अक्षयने १० मार्चला सायंकाळी दत्तात्रेय यास बोलवून घेतले. समीर शेख याच्या मदतीने त्याच्या डोक्यावर हातोडीने घाव घालून आणि गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली.दत्तात्रेयची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरील कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचा मृतदेह वरंधा घाटातील वारवंड गावच्या हद्दीतील दरीत फेकून दिला.
दत्तात्रेयचा मृतदेह १७ मार्चला पोलिसांना मिळाला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती.त्यानंतर पोलिसांनी पुणे व सातारा जिल्ह्यातील आणि पुणे शहरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली. त्यावेळी सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तात्रेय शिवराम पिलाणे मिसींग असल्याचे समजले.
दत्तात्रेयच्या वडिलांनी सांगितल्या प्रमाणे, अक्षय होळकर याने १० मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास बोलावून घेतले होते. त्यामुळे भोर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अक्षयच्या आणि त्याच्या मित्राच्या हालचालींवर लक्ष ठेवले.अक्षयच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी अक्षय होळकर व समीर शेख यांना सोमवारी ताब्यात घेतले.
त्यानंतर दत्तात्रेय पिलाणे याचा खून केल्याची दोघांनी कबूल केले. पोलिसांनी दहाच दिवसात कुठल्याही पुराव्याशिवाय व माहितीशिवाय खून झालेल्या व्यक्तीचे नाव आणि खून करणाऱ्या आरोपींना अटक केली