पुरंदर
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे, कर्नलवाडी परिसरात बारामतीच्या सोमेश्वर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर खडिमशीनचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रकल्पाला परिसरातील सहा गावातील नागरिकांचा प्रखर विरोध आहे.
गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी, पिंपरे, थोपटेवाडी, वाल्हे, सुकलवाडी या गावातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोलाईमाता देवस्थानच्या प्राचिन गुहे पासुन काही अंतरावर ही खडिमशीन नियोजित आहे. खडिमशीनसाठी लागणारे दगड याच ठिकाणी ब्लास्टींगचा वापर करून काढला जाणार आहे, त्यामुळे गुफा धोक्यात येऊ शकते. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या खडिमशीनच्या धुळीचा त्रास होऊ शकतो. शेजारील विहिरींचे पाणी जाऊ शकते.
या व अन्य कारणांमुळे आज सोमवार दि. २७ रोजी सकाळी ११ पासून गुळूंचे परिसरातील ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
आता या उपोषणावर प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.