सांगली
अंगावरून बस गेल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये ही घडली आहे. शफीन पिरजादे असे विद्यार्थ्याचं नाव असून तो बारावीच्या परीक्षेच्या एक्स्ट्रा क्लाससाठी निघाला असता हा भीषण अपघात झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांकडून बसवर दगडफेक करण्यात आल्याचाही प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शफीन पिरजादे वय वर्ष 17 हा विद्यार्थी इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. सध्या त्याच्या परीक्षा देखील सुरू होत्या.आणि परीक्षेसाठी शाळेमध्ये एक्स्ट्रा क्लासेस सुरू होते.
त्या क्लासला जाण्यासाठी घरातून शफीन निघाला होता. शहरातल्या दत्त चौक या ठिकाणी पोहोचला असता मागून येणाऱ्या बसला शफीनची शाळेची बॅग अडकली.यामध्ये शफीन हा बस बरोबर फरफटत गेला, आजूबाजूच्या लोकांनी याबाबत आरडाओरडा देखील केला, मात्र तो पर्यंत शफीनच्या अंगावरून बसची चाके गेली होती.
त्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, या अपघातानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक नुकसान भरपाई आठ दिवसामध्ये दिली नाही,तर सांगली राज्य परिवहन महामंडळ सांगली मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. तसेच संतप्त जमावाने बसच्या काचाही फोडल्या आहेत.