पुणे
संभाजी ब्रिगेड च्या वतीने पुणे महापालिका हद्दीत सुस,बाणेर,सुतारवाडी, पाषाण, परिसरात पुणे मुंबई हायवे वर अनाधिकृत मोठ मोठी व्यवसाईक शो रुम झाली असून त्यांच्यावर पुणे महापालिका प्रशासनाने कारवाई करावी यासाठी बेमुदत उपोषण पुणे महापालिका प्रवेशद्वारावर गेली दोन दिवसापासून चालू आहे. हे उपोषण करू नये यासाठी माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांना मोबाईल फोनवर फोन करून धमकी दिली असल्याची माहिती उत्तम कामठे यांनी दिली आहे.
यावेळी कामठे यांनी सांगितले की शिवतारे यांनी मला फोन करुन हे उपोषण मागे घ्या, अन्यथा खोटे गुन्हे दाखल करु, अशी धमकी दिल्याचा खुलासा कामठे यांनी केला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड च्या पदाधिका-यांनी माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांचा जाहीर निषेध केला असून,असल्या धमक्यांना संभाजी ब्रिगेड संघटना घाबरत नाही.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांच्या विरोधात आंदोलन करत नसून प्रशासन सर्व सामान्य गोरगरिबांच्या घरावर अतिक्रमण कारवाई करते, तर बलाढ्य व पैसेवाल्यांनी अतिक्रमण करुन बांधलेल्या शोरुमवर पण कारवाई करण्यात यावी,अशी आमची मागणी आहे, यासाठी जनतेने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे असेही आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिका-यांनी केले आहे.
जो पर्यंत या अतिक्रमण झालेल्या शोरुम वर कारवाई होत नाही, तो पर्यंत संभाजी ब्रिगेड संघटना आंदोलन करणार असल्याचा खुलासा देखील यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी केला आहे.