औरंगाबाद
आयपीएल सुरु होण्यासाठी लिलाव पार पडतात. या लिलाव प्रत्येक संघ खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी लाखो कोटींच्या बोली लावतात. खेळाडू जितका मोठा तितकी बोली मोठी, असं एकंदर त्या लिलावाचं चित्र असतं. असंच काहीसं औरंगाबादेत घडलं आहे. मात्र क्रिकेटचा येथे काहीच संबंध नव्हता. येथे लिलाव ग्रामपंचायचीचा होत होता.
मतदारांच्या मताच्या अधिकारातून निवडून दिलेल्या उमेदरांकडून सरपंच, उपसरपंच अशा पदासाठी पैशांची उधळण सुरु होती. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीत लिलावाचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.पैशाची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचं समोर आलं आहे. सरपंच पद साडेचौदा लाखात (१४.५० लाख) तर उपसरपंच पद ४ लाखात विकले गेले.
७० हजारांपासून २ लाखापर्यंत बोली लागली. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव झाला.सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव केल्याचा आरोप होत आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा इन्कार केला आहे. गावातील नागरिकांनी लिलावाची जाहीर कबुली दिली आहे.
शकुंतला योगेश ससेमहल असं साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंचपदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने हा सगळा प्रकार उघड केला आहे.