पुणे
शनिवारी संध्याकाळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्यांने शाई फेकली होती. या घटनेनंतर राज्यातील राजकारणात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली असली तरी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे
अशातच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर सर्वत्र उमटताना दिसत आहेत.महापुरुषांचा अवमान प्रकरणात अकोला येथे वंचित युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीक गोळा करून ‘मनोरुग्ण भाजपा उपचार फंड’ म्हणून वेड्याच्या रुग्णालयास मनिऑर्डर केली आहे. सध्या हे आंदोलन चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल आणि भाजपचे पदाधिकारी सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीआई फुले, शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य करीत असल्याचा आरोप यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन युवा आघाडीने स्थानिक फतेह चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह मार्गाने नागरिकांकडून एक एक रुपया जमा केलाय. 289 रुपये जमा झालेली ‘भिक’ चंद्रकांत पाटील यांच्या उपचारासाठी ठाणे आणि नागपूर मेंटल हॉस्पिटला मनी ऑर्डर करण्यात आली आहे, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.