पुणे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला आहे. हा वाद पुढील ४८ तासांत शांत झाला नाही, तर मला कर्नाटकात जावं लागेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं.
पवारांच्या या विधानावरून शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी खोचक टोला लगावला आहे.४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? असा सवाल शिवतारे यांनी विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी शिवतारे म्हणाले की, “सीमावादावरून शरद पवार शंभर टक्के राजकारण करत आहेत. ते आता म्हणत आहेत की, ४८ तासांत काही झालं नाही तर मी स्वत: तिथे जाऊन लोकांना धीर देतो.
पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्याकाळात त्यांनी काय केलं? त्यावेळी सीमावाद का सोडवला नाही?” असे प्रश्न शिवतारे यांनी विचारले.”एखाद्या गोष्टीचं राजकारण करून मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्याचं काम केलं जात आहे. हे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. प्रचंड वेगाने निर्णय घेत आहे. महाविकास आघाडीला तीन वर्षात जे जमलं नाही, ते सगळे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या तीन महिन्यात घेतले आहेत.
या निर्णयांमुळे या सरकारची लोकप्रियता आणखी वाढेल आणि आपल्याला अडचण निर्माण होईल, यासाठी केलेलं हे नाटक आहे,” असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला.शिवतारे पुढे म्हणाले, “४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केलं? असा माझा सवाल आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, तिथे चांगल्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेता येतील,” असंही शिवतारे म्हणाले.