पुणे
पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुर्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अयुब शेख असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवी घोरपडे गंभीर जखमी झाले आहे.शेख बिगारी काम करतो तर घोरपडे पेंटर आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून, एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता.
त्या वेळी शेख याचा पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकला.घोरपडेने श्वानाला दगड मारला.या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, शेख याने घोरपडे याच्यावर थेट कुर्हाडीने वार केले. यात घोरपडे गंभीर जखमी झाला. यावरून चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.