पुणे
विजय हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडनं सेमिफायनलमध्ये आसामविरुद्ध शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडनं क्वार्टर फायनलमध्येही द्विशतक केलं होतं. त्यात त्यानं षटकारांची आतषबाजी केली होती. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं आसामविरुद्ध ८८ चेंडूंत शतक साकारलं. १६८ धावांची तुफानी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या प्रकारात त्यानं ६० पेक्षा अधिकच्या सरासरीनं धावा कुटल्यात.
ऋतुराजनं गेल्या ९ डावांत सात शतके झळकावली आहेत. त्यात एक द्विशतक आहे. त्यानं मागील सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावांची नाबाद खेळी केली. त्यात लागोपाठ सात षटकार मारले. गायकवाड याने यूपीविरुद्ध खेळताना इतिहास रचला. एकाच डावात १६ षटकार ठोकले. या खेळीत १० चौकारही मारले होते. टीम इंडियात स्थान न मिळालेल्या ऋतुराजच्या बॅटमधून धावांची बरसात होत आहे. महाराष्ट्राकडून खेळताना तो धावांचा पाऊस पाडत आहे. ऋतुराजला आगामी काळात टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून स्थान मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.