मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं आणि राज्याचं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या कृतीचा अनिसने जाहीर निषेध केला असून विरोधकांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना जोरदार टोला हाणला आहे.स्वत: बद्दल आत्मविश्वास नसला, की ज्योतिषाकडे जावं लागतं, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली.
या पत्रकारपरिषदेत त्यांनी हा टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील टीका केली आहे. शिवरायांबाबत वक्तव्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मर्यादा सोडली. असं म्हणत त्यांनी राज्यपाल कोश्यारींवरही निशाणा साधला आहे.राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दोन महिन्यात कोसळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला.
यावर उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी काही ज्योतिषी नाही. मी काही सांगू शकणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही. तसंही मी हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता नवीन गोष्टी पाहत आहोत. जे महाराष्ट्रात कधी नव्हतं, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.