जळगाव
जामदा (ता.चाळीसगाव) येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहावयास मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केलाजामदा येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. दरम्यान सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ग्रामसभा बोलावण्यात आली.
त्यातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांसह अंगणवाडीच्या जागेचा व अवैध धंदे बंद करण्याबाबतचा मुख्य विषय ऐरणीवर होता.ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा या वेळी नागरिकांचा विशेषत: महिलांचा तीव्र रोष दिसून आला. तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी मांसविक्री बंद करण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आला. गावातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली.
ग्रामसभेत तसा निर्णय झाल्यानंतर संतप्त महिलांनी रौद्ररूप धारण करीत अवैध धंदे बंद करण्याबाबत यापूर्वीही तक्रार करून देखील काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामसभेत उपस्थितीत महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून कुलूप लावून घेतले.सदर घटनेची माहिती नागरिकांनी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड व सहकाऱ्यांनी जामदा गावात धाव घेतली. कार्यालयात कोंडलेल्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढले.
या वेळी महिलांनी गावातील अवैध धंदे विशेषत: दारूचे अड्डे तत्काळ बंद करण्याची मागणी केली. निरीक्षक आव्हाड यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत अवैध दारूविक्रीचे ठिकाण शोधून काढत जवळपास २५० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करून ते जागेवरच नष्ट केले. अवैध धंदेचालकांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले.