मुंबई
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांनी आज, १४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी एक ट्विट केलं.
या ट्विटमधून त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आव्हाडांच्या या घोषणेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माझ्या विरोधात पोलिसांनी गेल्या ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर केला आहे.
त्यामुळे आपण पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहोत असं आव्हाड म्हणाले आहेत.हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता.
त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती.रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी आव्हाडांवर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला होता.
40 वर्षीय तक्रारदार महिलेनं आव्हाड यांनी एका कार्यक्रमात चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली.
याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे.