पुणे
येणाऱ्या 2024 च्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना एकमेव टक्कर देणारा उमेदवार विजय शिवतारे असणार यात कुठलीच शंका नाही. येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही तडजोड होणार नाही.
जनतेची इच्छा असेल, राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षांनी सांगितले तर बारामती लोकसभा मतदार संघातून मी निवडणूक लढवण्यास केव्हाही तयार असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले. त्यांनी बारामती लोकसभा उमेदवारी बाबत आपली प्रकट ईच्छा बोलून दाखवत दंड थोपटले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी शिवतारे बारामतीत आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण बारामती लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे सांगितले.शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघाचा सात-बारा कोणाच्या नावे नाही. हा सात-बारा जनतेच्या हाती आहे. माझी लढाई परिवाराशी नसून प्रवृत्तीशी आहे. येथे सर्वसामान्यांना दाबून टाकले जाते. सहकारी संस्थांवरील वर्चस्वातून अनेकांना त्रास दिला जातो.
बारामतीतही बदल घडू शकतो. गेली तीन-चार पिढ्या एकाच कुटुंबाचे येथे राजकारण सुरु आहे. जनतेने ठरवले तर बदल नक्की होऊ शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नुरा कुस्ती होत असल्याची चर्चा व्हायची. गत निवडणूकीत आम्ही त्यांना घाम फोडला होता. यंदाही नुरा कुस्ती होणार नाही.
परंतु आपण संकटात आहोत हे दिसले तर बारामतीकर कोणाच्याही पाया पडतील, भावनात्मक बोलून स्वतःकडे मतदान वळवतील. त्यात ते माहिर आहेत. मी निर्भिडपणे टक्कर देणारा माणस आहे. जनतेची इच्छा असल्यास.जनतेची इच्छा असल्यास, नेतेमंडळींनी आदेश दिल्यास बारामतीचे शिवधनुष्य पेलण्यास मी तयार आहे.
अजित पवारांना खुले आव्हान..
पुरंदरमधून मी कसा निवडून येतो, अशी डायलॉगबाजी अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाची जागा काँग्रेसला दिली. अन्य सहा पक्षांना एकत्र केले. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत पराभव घडवून आणला. परंतु त्यांना लोकसभेला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही. मागच्यावेळी केलेली डायलॉगबाजी त्यांनी आत्ता करून दाखवावी. त्यांना एवढा अहंकार आहे तर राज्यात आजवर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का करू शकले नाहीत, असा सवाल शिवतारे यांनी केला. अशा प्रवृत्तींना वेळ आल्यावर निश्चित गाडू असेही म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.