मुंबई
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला.
या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत.रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोपाचे पुरावे येत्या एक तारखेपर्यंत द्यावे, अन्यथा मोठा बॉम्बस्फोट करणार, असे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.
इतकंच नाही, तर माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे.बच्चू कडू यांनी पैसे घेऊन सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी राणांना परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्याही कानावर हे घातलं आहे. तरी तो आरोप करतोय. त्याला उत्तर द्यावं लागेलच.
शांत राहिलो, तर लोक म्हणतील खोके घेतले. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.इतकंच नाही तर, रवी राणा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आल्यानंतर त्यांच्या पत्नीने भाजपाला पाठिंबा दिला. तेव्हा तो पाठिंबा पैसे घेऊन दिला होता का? सगळे पैसे घेऊनच पाठिंबा देतात असं नसतं. त्यामागे वेगवेगळी कारणं असतात.
आम्ही आमच्या मतदारसंघाचा विचार केला, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांचा विचार केला, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना चांगलंच सुनावलं आहे. मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. आम्हाला राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर.
उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत आम्ही. आम्ही घालून टाकू नांगर”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.