पुणे
पुण्यात एका दहावीत शिकणाऱ्या मुलानं नववीत शिकणाऱ्या मुलावर चक्क कोयत्याने सपासप वार केले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ही घटना घडली. शाळेच्या आवारातच घडलेल्या या थरारक घटनेनं एकच खळबळ उडालीय. ना शिक्षकांचं भय, ना शिक्षेची चिंता, अशा मनस्थितीपर्यंत पोहोचलेल्या दहावीतल्या विद्यार्थ्याने हे कृत्य का केलं, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलाय. यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याच्या अनेक घटना सातत्यानं समोर येऊ लागल्यात. सिनेमांत सर्रास वापरला जाणाऱ्या कोयता आता मुलं दादागिरी करण्यासाठी वापरत असल्याचं यानिमित्तानं पुण्यात पाहायला मिळालंय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण लक्षणीय असल्याचं निदर्शनास आलंय. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयात ही घटना घडली. दहावित शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नववी मध्ये शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने वार केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. ही घटना शाळेतच घडली. दहावीच्या मुलाने जुना वाद डोक्यात ठेवून हा प्रकार केल्याचे समोर आलंय.
कुणाल विकास कराळे (वय 15) असे जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. कुणालच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झालीय. त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कराळे आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलांचा वाद झाला होता. एका महिन्यापूर्वी झालेल्या वादावर शिक्षकांनी तोडगाही काढला होता. त्यानंतर हा वाद मिटला होता. पण दहावीतल्या विद्यार्थ्याच्या डोक्यातून हा वाद गेला नव्हता.
दहावीतील मुलाने खुन्नस डोक्यात ठेवून कोयता लपवून शाळेत आणला. कुणाल हा पुढे जात असताना शाळेच्या मैदानातच पाठीमागून कोयत्याने त्याच्यावर तीन ते चार वार करण्यात आले होते. यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंद करुन घेतला आहे. पुढील कारवाई मंचर पोलीस करत आहेत.