पुणे
येथील धायरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . एका तरुणाने अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटलीने आणि झाडाच्या कुंडीने हल्ला करण्यात आला. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (१७) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे.पुण्यातील वडगाव बुद्रुकच्या जाधव नगरमध्ये तो राहत होता. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली.
मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागेश हा वडगाव बुद्रुक येथील पाऊंजाई मंदिराच्या मागे असलेल्या घुले नगर परिसरात एका मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसला होता.दरम्यान, त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घातली.
या हल्ल्यामुळे नागेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.