वर्धा
शिंदे सरकारने पालकमंत्र्याची घोषणा केली आहे. शिंदे सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नाना पटोलेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पालकमंत्री पदावरून केलेल्या टीकेला उत्तर दिले.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही.
नाना पटोले यांनी त्यांच्या जिल्ह्यात,मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितले पाहिजे. फडणवीस यांना वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला माहित आहे. नाना पटोले यांना अभ्यास करावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची उंची राहिली नाही. नाना पटोले हे जिल्ह्याचे नेते राहिले आहे. काही दिवसात विधानसभेचे नेते होतील अशी त्यांची स्थिती आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षे झाले धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांची वीज कापली. शेतकऱ्यांना वीज दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाबाबतच्या व्हिजनबद्दल नाना पटोले हे एक टक्का देखील बरोबरी करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची पूर्ण माहिती आहे, असेही ते म्हणाले.