जळगाव
सध्या वेदांतावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी वेदांतावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकावून त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, असा कळवळा दाखवणं आदित्य ठाकरे यांनी बंद करावे. त्यापेक्षा सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी सेमी कंडक्टर पॉलिसी जर वेळेत आणली असती तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असणाऱ्या वेदांताला आपल्या राज्यात आणखी मदत मिळाली असती असं पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, जेव्हा सत्तेत होते तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे पेंग्विन आणायला, परदेशात फिरायला घरी बसायला वेळ होता. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती ग्लोबल झाली पाहिजे ही आमची भावना आहे.
मात्र जुन्या सरकारला त्यासाठी वेळ नव्हता आदित्य ठाकरे कधी ग्रामीण भागाकडे फिरकले देखील नाहीत, असं उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.कायदे मंडळाच्या सदस्यांनी पॉलिसी तयार केली पाहिजे. पण यांना मलीदा खाण्यातून वेळ मिळाला नाही. आदित्य ठाकरेंनी कायदेमंडळाचे सदस्य असताना सभागृह चालवलं नाही.
मग ते काय फक्त मलिदा खाण्यासाठी पर्यावरण मंत्री झाले होते का? असा देखील टोला खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच एमआयडीसी जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याची देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.