मावळ
मावळ तालुक्यातील डाहुली गावातील ग्रामस्थ सरपंचाच्या मनमानी कारभारा विरोधात आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सरपंच यांनी मनमानी निर्णय घेऊन ग्रामस्थांवर लादल्याने ग्रामस्थांनी थेट ग्रामसेवकास घेराव घातला.
ग्रामसभेत ग्रामस्थांच्या संमतीने निर्णय घेतले जातात. परंतु डाहुली येथे सरपंच यांनी तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ग्रामस्थांचा विरोध असताना केली. स्वतःच्या मर्जीने सरपंच यांनी निर्णय घेतल्याने ग्रामसभेत गदारोळ झाला.
यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून सरपंच यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकास घेराव घातला. हा निर्णय योग्य नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी मांडली. दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या निवड़ीवरूनच डाहुली गावात तंटा सुरु झाल्याची चर्चा मावळात रंगू लागली आहे.