सांगली
कडेगाव तालुक्यातील बेलवडे येथे पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आपल्या आईला शिवीगाळ करीत काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता येथे घडली आहे. याबाबत संशयित शहाजी बाजीराव जाधव यांच्या विरुद्ध कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर सुभद्रा बाजीराव जाधव वय-६५ असे जखमी आईचे नाव आहे.
तालुक्यातील बेलवडे येथील सुभद्रा जाधव या गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपले घराचे अंगणात बसल्या होत्या. यावेळी त्यांचा लहान मुलगा संशयित शहाजी जाधव हा तेथे दारु पिऊन येवुन पैसे मागु लागला.
त्यावेळी सुभद्रा या त्याला आता पैसे नाहीत तू कामावर जा मी तुला पैसे देते असे सांगत असताना मुलगा शहाजी याने आई सुभद्रा यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच अंगणात पडलेल्या काठीने त्यांना मारहाण केली इतकेच नाही तर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सुभद्रा जाधव यांनी कडेगाव पोलीसात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत.