पुणे
पुणे जिल्ह्यातील भोर येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. भोर येथील रायरेश्वराच्या पठारावर ट्रेकिंगला गेलेल्या बारामती येथील एका अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विद्यार्थी हा बारामतीमधील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील आहे. शुभम चोपडे असं १७ वर्षीय मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले ४६ विद्यार्थी आणि ४ शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात होते. त्यामध्ये शुभमचाही सामावेश होता. ट्रेकिंग दरम्यान शुभमला दम लागला.
त्यानंतर रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले गावाजवळ त्याला हृदयविकाराच्या झटका आला. त्यामुळे त्याचे मित्र त्याच्यासाठी धावत त्याच्या जवळ आले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला.
दरम्यान,भोर तहसीलदार यांनी सदर घटनेची माहिती दिली.भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर चढत असताना कोर्ले या गावाजवळ बारामतीत राहणाऱ्या १७ वर्षीय शुभम प्रदीप चोपडे या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे.
सदर विद्यार्थी हा शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी असून सदर शाळेची सहल रायरेश्वर किल्ल्यावर ती आलेली असताना सदरची घटना घडलेली आहे’,अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, शुभमच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या घटनेने त्याच्या शिक्षक आणि मित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.