पंढरपूर
आज आषाढी यात्रेसाठी लाखो वारकऱ्यांचे आगमन झाल्याने पंढरी सजली आहे. पालख्यांचे पंढरपुरात आगमन झाल्याने वारकऱ्यांमध्ये भक्तीभाव दरवळला आहे. पंढरपूरच्या वेशीवर येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते. चंद्रभागा नदीतही पोहण्याचा आनंद वारकरी घेत असतात.
परंतु, आज पंढरपूरात एक दु:खद घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन तरुण आज आषाढी वारीसाठी पंढरपूरला आले होते. दर्शनापूर्वी तिन्ही तरुण चंद्रभागानदीवर स्नानासाठी गेले होते. मात्र, नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण वाहून गेल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या तरुणाला वाचविण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या तरुणांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सचिन शिवाजी कुंभारे (२८) आणि विजय सिद्धार्थ सरदार (२७) अशी मृतांची नावे आहेत. एकादशीच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.