पुरंदर
सासवड भाजीबाजारातील राडा आज संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा व्हायरल झाला. सासवड नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि आमदारांच्या दुर्लक्षामुळे सोशल मीडिया मध्ये आज नेटकऱ्यानी आज आमदार संजय जगताप यांना चांगलेच घेरले. शेतकरी वर्गातही या प्रकारामुळे तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षापासून सासवडचा भाजी बाजार म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ झाला आहे. सतत जागा बदलून शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. मनाला वाटेल तसा भाजी बाजार खेळण्यासारखा इकडून तिकडे फेकला जात आहे. गेल्या वर्षापासून हा बाजार सासवडच्या वाघ डोंगराजवळ भरवला जातो. पण इथे असलेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे अक्षरश: घसरगुंडी सुरू आहे.
जागा खाजगी, वसुली नगरपालिकेची
वाघ डोंगर परिसरातील जागा ही खाजगी व्यक्तीची आहे. तरीदेखील सासवड नगरपालिका इथे शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करते. काहीही संबंध नसताना पालिकेचे ठेकेदार हे पैसे घेतात. इथे ना रस्ता, ना पाणी ना डोक्यावर छत मग पैसे जातात कुठे असा सवाल जिल्हा नियोजन समिती सदस्य माणिक निंबाळकर यांनी केला आहे.
शेतकरी या बाजारातून धड चालुही शकत नाही. अंगावर मालाची बोचकी घेऊन अनेक शेतकरी या राड्यात घसरून पडत आहेत. व्यापारीही त्यामुळे इकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे नुकसान शेतकऱ्याचेच होत असून बाजारभाव ही मिळेना झाला आहे.
काय तो बाजार, काय तो चिखल…
राजकीय अस्थिरतेच्या काळात आमदार शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगने महाराष्ट्राला भुरळ घातली असताना शेतकऱ्यांनीही या डायलॉग द्वारे आपली व्यथा सोशल मीडियात मांडून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. काय तो बाजार, काय तो राडा, काय ते १२०० कोटी असे डायलॉग फेकत नेटकऱ्यानी आमदार संजय जगताप यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी राष्ट्रीय बाजार गेला, आंतर राष्ट्रीय बाजार आला अशा शब्दात खिल्ली उडवली आहे.