पुरंदर
ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलेले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा कोरोनापूर्वी इंग्रजी माध्यमात दाखल झालेला विद्यार्थी आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळला आहे .त्यामुळे पूर्वी बंद पडण्याच्या दिशेने वाटचाल असलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा एकदा सक्षमपणे उभी राहील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु जिल्हा परिषद पातळीवर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या पदांच्या रखडलेल्या पदोन्नती, रखडलेली संचमान्यता व बिंदूनामावली यामुळे शिक्षकांच्या बदल्या देखील रखडलेल्या दिसतात.
जिल्हा परिषदे कडून महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आजही आहेत.महानगरपालिकेने त्यांचा समावेश करून घेण्यास नकार दर्शविला आहे. परंतु अद्यापही या गावांमधील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्याने या शिक्षकांच्या बदल्या ग्रामीण भागामध्ये होऊ शकलेल्या नाहीत .खरं तर गेल्या वर्षभरापासून विनाशिक्षक ग्रामीण भागातील शाळा एक अथवा दोन शिक्षकांनी अथक परिश्रम करून चालवलेल्या आहेत.
मात्र आता त्यांनाही शाळा चालवणे अशक्य होत आहे .आपल्या पाल्याला शिक्षक नसल्याने परत एकदा आर्थिक परिस्थिती नसतानाही नाईलाजाने ग्रामीण भागातील पालकाला दुसऱ्या गावातील शाळेत आपल्या पाल्याला घालावे लागत आहे अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळावे लागत आहे.
हीच परिस्थिती राहिली तर या वर्षाच्या अखेरीस जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना इंग्रजी माध्यमाची फी परवडत नसल्याने त्याच्या समोर तर फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची प्रशासनाची याबाबतीतील उदासीनता पाहता त्यांनाही जिल्हा परिषदेच्या शाळा चालवण्यामध्ये काही स्वारस्य राहिले नाही की काय अशी शंका आल्या वाचून राहत नाही.
अशा परिस्थितीत आता शिक्षक मिळाला नाही तरी शाळेला टाळे ठोकल्याशिवाय पालकांसमोर पर्याय उरलेला नाही. भविष्यात ही परिस्थिती आपल्याला ग्रामीण भागात दिसून आल्याशिवाय राहणार नाही .तरी जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाची संपर्क साधून तातडीने पावले उचलणे आवश्यक आहेत अन्यथा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत असे मत पुरंदर तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष हरिदास खेसे यांनी सांगीतले.