उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका मुलाने आईची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशच्या बैतूलमधून एका मुलीने आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या पतीला अटक केली आहे.
बैतूल एसपी सिमाला प्रसाद यांनी सांगितलं की, राणीपूर भागात हायवे बाजूच्या जंगलात 6 जूनला एका पोत्यात मृतदेह सापडल्याची सूचना मिळाली होती. पोलिसांनी पाहिलं तेव्हा मृतदेह सडलेला होता आणि वास येऊ लागला होता. पोतं उघडून पाहिलं तर त्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह होता जो 6 ते 7 दिवस जुना होता. चौकशी केल्यावर हा मृतदेह 60 वर्षीय भागीरथी झरवडेचा असल्याचं समजलं.
पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, भागीरथी तिची लहान मुलगी उषा वाईकरच्या घरी बैतूलमध्ये काही दिवसांपासून राहत होती. भारीरथीने एक प्लॉट विकला होता. ज्यातून तिला 5 लाख 82 हजार रूपये मिळाले होते. हे पैसे तिने मुलगी उषा वाईकरच्या खात्यात जमा केले होते.
भागीरथी हे पैसे आपल्या दोन मुलींमध्ये वाटून देणार होत्या. पण लहान मुलीच्या मनात लालसा निर्माण झाली.लहान मुलगी उषाला यातील पैसे मोठ्या बहिणीला द्यायचे नव्हते. यावरूनच 29 मे रोजी आई आणि मुलगी यांच्यात वाद झाला. यादरम्यान मुलीने आईच्या डोक्यात दगड मारला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
यानंतर उषाने पतीच्या मदतीने मृतदेह पॉलिथिनमध्ये भरून पोत्यात टाकला आणि हायवे जवळच्या जंगलात नेऊन फेकलं. बरेच दिवस आईसोबत बोलणं झालं नाही म्हणून मोठ्या बहिणीने उषाला फोन करून आईबाबत विचारलं. यावेळी उषाने खोटं सांगितलं की, आई नर्मदापुरमला गेली होती. तिथे आंघोळ करताना ती नदीत बुडाली आणि तिची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
नंतर पोलिसांनी चौकशी दरम्यान छोटी मुलगी उषाने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी उषा वाईकर आणि तिचा पती करण वाईकर यांना अटक केली आहे.