पुणे
एका घटनेने सध्या पुण्यात खळबळ उडाली आहे. एका कुंटूंबाने मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. मुठा नदीच्या कालव्यात पोहायला गेलेला मुलगा हरवला असल्याचे कुंटूंबाचं म्हणणे होते.
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तपास केला असता, त्यांना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख कुटुंबाला पटली. हा आपलाच मुलगा असल्याचं सांगत हे कुटुंब मृतदेह घेऊन गेलं आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.
दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांना देखील एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. कुटूंबाला विचारले असता मुलगा आपलाच असल्याचं सांगत त्यावरही अंत्यसंस्कार केले.
हडपसर पोलिसांनीही ओळख पटताच सोपस्कार करून मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला. त्याच्यावरही अंत्यसंस्कार झाले. यावेळी या कुटुंबाने आदल्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना काहीही सांगितलं नाही. आता दोन्ही मृतदेह एकाच मुलाचे कसे असू शकतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याच संदर्भात माहिती घेण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी या कुटुंबाला फोन केला. तेव्हा त्यांनी अजबच दावा केला. हडपसरमध्ये सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा होता आणि स्वारगेट पोलीस कोणत्या मृतदेहाबद्दल बोलतायत हे आपल्याला माहित नाही, असं या कुटुंबाने सांगितले. त्यामुळे आता स्वारगेट पुन्हा एकदा त्या १६ वर्षीय मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान , मुठा कालव्यातच हरवलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाचा सिंहगड पोलीस देखील तपास करत बागेत. धायरीतला हा मुलगा आपल्या मित्रांसोबत कालव्याकडे फिरायला गेला होता , त्यानंतर तो गायब झाला.
आता स्वारगेट पोलिसांना सापडलेला मृतदेह धायरीतल्या या मुलाचा असण्याची शंका सिंहगड पोलिसांना वाटत आहे. या धायरीतल्या मुलाच्या कुटुंबाला स्वारगेट पोलिसांनी आपल्याकडच्या मुलाच्या मृतदेहाचा फोटो दाखवला . पण हा आपला मुलगा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता या प्रकरणातला सखोल तपास सुरू आहे.