पुरंदर
पिंपरी येथे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या विकास कामांचा धूमधडाका सुरू आहे.चार दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या हंबिरवाडी नजीकच्या रस्त्यावरील डांबर हाताने उकरले जात असून जवळच सुरू असलेल्या साकव पुलामध्ये मुरूम ऐवजी मातीचा सर्रास वापर केला आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी गावच्या हांबिर वाडी ते मावडी सुपे या रस्त्यावरील शेंडकर मळ्यानजिक पाईप साकव पुलाचे बांधकाम सुरू आहे.पुलाच्या मध्यभागी नियमाप्रमाणे मुरूम टाकणं गरजेचे आहे.मात्र याठिकाणी मुरूम ऐवजी गाळ मिश्रित मातीचा सर्रास वापर केला असल्याचे पहावयास मिळत आहे.
ठेकेदाराने निकृष्ट पद्धतीने काम पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे.पिपरी गावचे सरपंच दिलीप शेंडकर,उपसरपंच मोहिनी हंबिर व सदस्य कविता शेंडकर, काळूराम हंबीर,यांनी आज सकाळी पुलाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाबाबत नाराजी व्यक्त केली.पुलापासून जवळच हंबिर वाडी येथील चार दिवसापूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्याची देखील पाहणी केली.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या विकास कामांचा धूमधडाका सुरू आहे.अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहे.याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवला असता त्यांच्यावर तालुका पातळीवरून दबावतंत्र उगारले जात आहे.यामुळे डोळ्यादेखत निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत.
यावेळी जुन्या रस्त्यावर टाकलेले डांबर हाताने उकरत असल्याचे निदर्शनास आले.यामुळे रस्त्यासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च मातीत मिसळला आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.सुरू असलेले पुलाचे काम व पूर्ण झालेले रस्त्याचे काम गावातीलच एका ठेकेदाराकडे आहे.
आपल्याच गावातील ठेकेदार काम निकृष्ट दर्जाचे करत असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.यावेळी माजी सरपंच अनिल हंबिर,नामदेव हंबिर,निलेश हंबिर, कौसल्या शेंडकर,यमुना शेंडकर,पारुबाई शेंडकर,प्रमोद शेंडकर,रवींद्र शेंडकर,गौरव मोडक,दत्तात्रय शेंडकर व शेंडकर मळा, हांबिरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.