स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले,मग विष प्राशन करुन “या” प्रेमी जोडप्याने केली आत्महत्या !!!!

स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले,मग विष प्राशन करुन “या” प्रेमी जोडप्याने केली आत्महत्या !!!!

नांदेड

आपल्या लग्नाला घरच्या कुटुंबीयांचा विरोध होईल असे गृहीत धरून एका जोडप्याने नांदेडमध्ये जीवनयात्रा संपवली आहे. दोघांनी आपल्या व्हाट्सअपच्या स्टेटसवर स्वतःच्याच श्रद्धांजलीची पोस्ट टाकून आज भल्या पहाटे विष घेतले.

या जोडप्यांच्या मित्रांनी त्यांचे व्हाटस अपचे स्टेटस पाहिल्यानंतर आत्महत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडली आहे.

या गावात राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचे आणि २२ वर्षीय युवतीचे प्रेम जुळले होते. म्हणायला हे दोघेही एकाच जातीतील होते, मात्र पोटजात किंवा तत्सम भेदभाव आपल्या प्रेमात अडथळा निर्माण करेल अशी चिंता या जोडप्याला सतावत होती.

मात्र त्यांच्या या प्रेम संबंधाची पुसटशीही कल्पना घरच्यांना न्हवती. कदाचित या जोडप्याने आपल्या प्रेमाबाबत घरच्यांशी चर्चा केली असती तर जोडपे जिवंत असते अशी चर्चा तामसा परिसरात रंगली आहे.

आज पहाटे सदर तरुणी तरुणाला त्याच्या शेतात भेटायला गेली. तिथे दोघांनीही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. मयत जोडप्यांच्या मित्रांनी व्हाट्सअपचे श्रद्धांजलीचे स्टेटस पाहून त्यांना फोन केले.

पण तरुणाच्या फोनला उत्तर येत नसल्याने मित्रांनी या घटनेतील तरुणाच्या वडिलांना कल्पना दिली. त्यानंतर शोधाशोध केली असता हे जोडपे शेत शिवारात मृतावस्थेत आढळून आले.

यातील दोन्ही मयताचे पोस्ट मार्टम दुपारी तामसा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलं. त्यानंतर दोघांवर तामसा इथल्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेने मयताच्या घरच्यांना जबरदस्त शॉक बसलाय. असं काही असेल आणि त्यातून दोघे टोकाचा निर्णय घेतील असे कुटुंबाला अजिबातच अपेक्षित नव्हते.

स्वतःच्या प्रेम प्रकरणाबद्दल या जोडप्याने घरच्यांना विश्वासात घेतले असते तर कदाचित त्यांच्या प्रेमाला मान्यता मिळाली असती अशी चर्चा तामसा परिसरात रंगलीय.

या जोडप्यावर तामसा इथे अंत्यसंस्कार करताना त्यांच्या घरची मोजकीच मंडळी आणि त्यांचे मित्र सहभागी होते.

मृत दोघांनी थोडीशी हिंमत करून कुटुंबाला आपल्या प्रेमाबाबत कल्पना दिली असती तर कदाचित त्यांच्यावर आत्महत्येची वेळच आली नसती असे मयतांचे मित्रही सांगत होते. या अनपेक्षित घटनेने तामसा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *