मुंबई
संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिनाचा सोहळा मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला. यासाठी संपूर्ण राज्यातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णायक दिशा ठरवण्यासाठी हा महामेळावा मुंबईतल्या वांद्रेतील रंगशारदा सभागृहात घेण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते देखील ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी संभाजी ब्रिगेडची आधीपासूनची मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक मुक मोर्चा, ठोक मोर्चा निघालेत.
लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्च्यात सहभागी झाला होता. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, असं संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. मनोज आखरे म्हणाले.
मराठा आरक्षणातील घोळाला महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे वकील कुंभकोणी जबाबदार असून षड्यंत्र रचत मराठा आरक्षणाला डावललं गेल्याचा आरोप ॲड मनोज आखरेंकडून करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाज आमच्या पाठिशी आहे मात्र ओबीसी नेत्यांकडूनच राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील मनोज आखरे यांनी ओबीसी मंत्र्यांवर केला आहे.