चंद्रपूर
चंद्रपुरात शाळेची घंटा वाजली आणि पहिला दिवशी गुरुजींना बेड्या पडल्या. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील तुकुम गावातील जिल्हा परिषद शाळेत हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती आहे. इतर विद्यार्थिनींना स्वच्छता मोहिमेसाठी पाठवून मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. सात विद्यार्थिनी तक्रारदार असलेल्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तुकूम गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी शाळेत पोहोचलेल्या पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
शाळेचा पहिला दिवस असल्याने फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत पोहचले होते. पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते. मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठवले आणि त्या आदिवासी मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली, त्यांनी पालकांना माहिती दिली. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत पोहोचत मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून पोलिसांना तक्रार केली.