१०० महिला-मुलींना लग्नासाठी गंडवणारा अखेर सापडला पोलिसांच्या जाळ्यात

१०० महिला-मुलींना लग्नासाठी गंडवणारा अखेर सापडला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे

तुम्हाला लखोबा लोखंडे माहिती आहे? अनेकांना कदाचित माहिती असेल. ज्येष्ठ लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेल्या पाच वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेपैकी लखोबा लोखंडे हे एक पात्र. लखोबा हा तंबाखू व्यापारी होता. पण त्याने वेगवेगळे सोंग धारण करत कित्येक महिलांची फसवणूक केली होती. अनेक महिलांना लग्नाचं आमीष दाखवत लुटलं होतं. हे पात्र त्या काळात प्रचंड गाजलं होतं. तेव्हापासून लखोबा लोखंडे हे फक्त नाव नाही तर वृत्ती मानली जाऊ लागली. अशा वृत्तीचे अनेक माणसं आतापर्यंत समोर आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशाच एका लखोबा लोखंडेचा प्रताप उघड झालाय. तो खरंतर मुळचा चेन्नईचा आहे. पण त्याने पिंपरी चिंचवडच्या एका तरुणीला फसवलं. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय.

प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर तरुणीने त्याला भेटायला बोलावले. आरोपी चेन्नईहून पुण्याला विमानाने आला. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पुणे विमाननगर परिसरात अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *